विपश्यनामी धम्मगिरीला आलो आणि विपश्यनेचा कोर्स पूर्ण केला. इथे मी "पूर्ण केला" ह्या शब्दांवर भर दिला आहे, कारण ते खूप महत्त्वाचे आहे. मी व्यसनी माणूस असल्याने "बिनकामाचा", "निरुपयोगी", "एकही गोष्ट धड न करणारा" अशा अनेक पदव्या मी मिळवल्या होत्या. आणि त्या त्या गोष्टी पूर्ण करण्याचा मला खरोखर कंटाळा यायचा. त्यामुळे दहा दिवसांचा विपश्यनेचा कोर्स पूर्ण करणे ही माझ्या दृष्टीने खूपच मोठी मजल होती. आणि त्यामुळे जणू काही माझा आणि माझ्या आत्मविश्वासाचा पुनर्जन्मच झाला!
हा कोर्स चालू असताना मला भूतकाळाचे खूपच प्रतिध्वनी ऐकू येत होते. वाईट घटना आठवत होत्या. परंतु मल विपश्यनेचा सर्वात जास्त उपयोग मी घरी परत आल्यावर नियमित विपश्यना सुरू केल्यावर झाला. मला समजून चुकले की मला व्यसनाची होणारी आठवण, क्रेव्हिंग, हव्यास, गर्व हे सर्व एकप्रकारे माझ्या दु:खाचेच भोग/प्रकार आहेत. मला असेही वाटले की जणू काही विपश्यनेचे स्वरूप हे माझ्या ह्या प्रकारच्या दु:खांवर मात करण्यासाठीच केले आहे! हा कोर्स करण्यापूर्वी ही माझी "दु:खे" आहेत हे मला माहितही नव्हते! कारण तो माझ्या जीवनशैलीचा अविभाज्य भागच बनून गेला होता.
अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या गर्तेत मी अडकलो होतो. त्याचे जर तुम्ही विश्लेषण केलेत तर दिसेल की त्याचे मूळ हे "मानसिक हाव" ह्या विषयाकडे केवढे जाते! शारिरीक हाव, समस्या ह्या नंतर येतात, आणि त्या मानाने कमी असतात. अशा वेळी विपश्यनेचा मला खूपच उपयोग झाला. कारण विपश्यनेच्या तत्त्वानुसार आलेल्या अडचणींना सामोरे कसे जायचे हे मार्ग मला सापडू लागले. विपश्यनेच्या कोर्समधे संध्याकाळी गुरुजींचे प्रवचन असायचे. ते ऐकताना मनातील शंकांचे निरसन व्यायचे, आणि खूप बरे वाटायचे. इतके दिवस "बिनकामाचा", "निरुपयोगी" असलेल्या माझ्यामधे "आता आपल्यात काहीतरी चांगले सुद्धा आहे" किंवा "जगण्यात अर्थ आहे" असे विचार ययला लागले. ह्या विचारांमुळे व्यसनातून मुक्त होऊन एक चांगले जीवन जगण्यासाठी माझ्यात एक नवी शक्ती आली होती.
घरी परत आल्यावर मला सर्व काही सकारात्मक दिसत होते. मला एक आराम मिळत होता. हा आराम शारिरीक नसून मानसिक जास्त होता... अर्थातच माझ्या व्यसनाचा अजून अंत झाला नव्हता. व्यसन अधुन मधून डोके वर काढत होते. ही माझी दुर्बलता आहे आणि मला ती सोडवायची आहे, हे मला माहित होते. (नारकोटिक्स ऍनॉनिमसची दुसरी पायरी)
ध्यानह्या सर्व विपश्यनेच्या प्रवासाबरोबरच मला एक विचारांची दिशा मिळत गेली आणि मी व्यसनमुक्त झाले.
शेवटी मला एवढच म्हणावसं वाटतं की विपश्यना तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट शिकवते: तुमचा लढा तुम्हीच द्या! त्यातून तुम्हाला फक्त दोन अस्त्रे मिळतात: आनापान (श्वासातील जागरुकता) आणि विपश्यना (तुमच्या हरएक संवेदनेतील जागरुकता). बाकी सर्व काही तुमच्या मूल्यांवर, विचारांवर आणि आचारांवर अवलंबून आहे. ही शस्त्रे जर तुम्ही सतत बरोबर बाळगलीत तर येणा-या प्रत्येक प्रसंगाला तुम्ही धैर्याने तोंड देऊ शकाल.
विपश्यना ही जगण्याची खरोखर एक सुंदर कला आहे.


विपश्यना: व्यसनाशी लढा















